नवीनतम

मी आणि स्पोर्ट्स


नवोदय म्हणाल की, शैक्षणिक दृष्ट्या हुशार विद्यार्थ्यांची शाळा ही एकच बाजू समाजात पुढे आलेली दिसते. परंतु शिक्षण म्हटले की सर्वांगीण विकास , बहुअंगी विकास. बौद्धिक , भावनिक आणि शारीरिक विकास आदी त्याचे अंग.. पण शालेय जीवनात जो पर्यंत मी जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवा ( नंदूरबार ) येथे शिक्षण घेत होतो तो पर्यंत माझ्यातील मी बौद्धिक विकासावरच जास्त भर देत असायचो असे मागे वळून पाहताना वाटते.

कारण मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यमात स्विच होताना आलेल्या अडचणी , समजत नसतानाही पाठ केलेली उत्तरे , सातवीत आठवीत असताना पहिल्या तीन क्रमांकात  उत्तीर्ण होणे असो असे कितीतरी प्रसंग आहेत त्यात बौद्धिक विकासावरच जास्त लक्ष केंद्रित केलेले मला आठवते.


शारीरिक विकास म्हणाल तर फक्त सकाळची पिटी एवढाच माझा संबंध आलेला. त्यातच मी आळशी . झोपेचे खोबरे व्हायचे पण नाईलाजाने जायचो मॉर्निंग पिटी ला. नाहीतर गत्यंतर नव्हते. स्वर्गीय चौगुले सर म्हणजे शारीरिक शिक्षक कमी आणि कला शिक्षक म्हणून जास्त आवडायचे मला. त्यांच्या त्या नकला करणे, विनोद करताना विनोदी चेहरा करणे , आजही जसेच्या तसे आठवते.  आदरणीय चौगुले सरांनी आम्हाला "आली आली हो भागाबाई" हे भारुड बसवताना केलेली मदत आठवते. थोडक्यात काय तर क्रीडा कमी आणि कला शिक्षक म्हणूनच मी सरांकडे बघायचो. याच्या अगदी उलट म्हणजे आदरणीय काळपांडे मॅडम..म्हणजे जेलरच वाटायच्या. पण महिला क्रीडा शिक्षक असल्याने आणि मी ही शारीरिक शिक्षणात अगदी कमजोरच म्हणा म्हणून त्यांच्याशी फार काही तसा संबंध आला नाही.

दुसरी गोष्ट इथे नमूद कराविशी वाटते , क्रीडा म्हटले की आदिवासी विद्यार्थी हे समीकरण झालेले आठवते. कदाचित मी चुकीचा ही असू शकेल कारण मी तसे क्रीडा विषयाकडे दुर्लक्ष केलंच होत आणि त्यामुळे त्यावेळी क्रीडा स्पर्धेत कोणकोणते विद्यार्थी चमकत होते हे आता फारसे आठवत ही नाही. 

असे म्हणतात ना आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. आधीच शारीरीक दृष्ट्या अगदीच हलका आणि त्यात समोर आदिवासी बलदंड विद्यार्थी. त्यामुळे क्रीडा शिक्षकांच्या नजरेत भरणार कसा मी? असे आज विचार करताना वाटते. क्रीडा हे सुद्धा करियर चे मोठे क्षेत्र आहे हे त्यावेळी वाटलंच नाही कधी. संध्याकाळी ग्राऊंडवर क्रिकेट हाच एक खेळ खेळायचो आम्ही. आमच्या बॅचमध्ये शरद शिंदे नावाचा मित्र होता. काय क्रिकेट खेळायचा तो. लेग साईड ला आलेल्या चेंडूला कलई द्वारे बॅटचा हळूच स्पर्श करून सरळ सीमापार धाडायचा...सीमा म्हणजे शेताचा बांध होता तो. खेळ म्हणजे संध्याकाळचा टाईमपास होत होता माझ्यासाठी तरी.

नववीत की दहावीत क्रीडा शिक्षक म्हणून आदरणीय साळवे सर बदलीने jnv अक्कलकुवा येथे आले. आदरणीय शब्द लिहिताना मी सरांना वाकून नमस्कार करतोय अशी भावना आपसुकच मनात आली. कारण सरांचा शिरस्ता असायचा की गुरु दिसले की चरणस्पर्श करायचा. मला वाटले कला शिक्षक गेले आणि मूल्य शिक्षक आले. असो पण नंतर नंतर समजत गेले की साळवे सर म्हणजे अगदी हाडाचे क्रीडा शिक्षक होते. क्रिकेट खेळताना वाटायचे की सरांचा आवडता खेळ क्रिकेटच असावा इतक्या सफाईदारपणे ते क्रिकेट खेळायचे. दुसऱ्या दिवशी बघितले की सर व्हॉलीबॉल ही तितक्याच कौशल्याने खेळताना दिसायचे. बास्केटबॉल च्या बाबतीत ही तेच. सरांमुळे आम्हाला नवीनच खेळाची ओळख झाली.ती म्हणजे 🏉 रग्बी खेळाची. बॅट बॉल सोडून अंडाकृती बॉल पोटाला धरून आम्ही धावत सुटायचो दररोज संध्याकाळी. साळवे सर _क्रीडा शिक्षक म्हणजे  हरफन मौला होते.. कोच असावे तर साळवे सरांसारखे. एवढे चांगले क्रीडा शिक्षक लाभूनही अगदी नववी दहावीत आल्यावर सुद्धा खेळ म्हणजे मनोरंजन एवढेच मला ठाऊक होते.

मी सगळं अशा साठी लिहितोय की, असे म्हणतात ना मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही. अगदी तसेच माझे jnv अक्कलकुवा येथे झाले असावे. आदिवासी विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात एवढे निपुण होते की आमच्या सारख्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा विचार ही मनाला शिवायचा नाही. 

पण याउलट घडले jnv खेडगाव नाशिक येथे. Cluster level स्पर्धेसाठी प्रत्येक खेळ प्रकारानुसार खेळाडू निवड चालू होती. क्रीडा शिक्षक आदरणीय श्री शिरसाठ सरांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया चालू होती. ते पण शिस्तीने जरा कडकच होते...एखादा चुकला की सरांच्या तोंडून "माठ्या" शब्द आलाच म्हणून समजा . एक एक खेळ प्रकार संपत होते निवड होत होती. का कुणास ठाऊक धावणे प्रकार चालू झाला..मी ही हौस म्हणून राहिलो उभा स्पर्धेत..४०० मीटर धावणे प्रकारात मी निवडलो गेलो होतो... रडावे की हसावे हेच कळेना..एखाद्या चुकलेल्या पिल्लाला दुसऱ्यात कळपात सोडावे आणि तो ही अनोळखी मुलखात आल्यासारखा गांगरावा अशी माझी अवस्था झाली..मनोरंजन म्हणून भाग घेतला आणि निवडलो गेलो. स्वप्नातही वाटले नव्हते की एका क्रीडा प्रकारात शाळेचे प्रतिनिधित्व करेल म्हणून..मला एकदमच दडपण आल्यासारखे झाले..म्हणजे जी गोष्ट आपण हलक्यात घेत होतो ती आता माझ्या मानगुटीवर येऊन बसली होती..शालेय जीवनाच्या इतिहासात कधी नव्हे ती क्रीडा क्षेत्रातील एक जबाबदारी माझ्या अंगावर आलीय अशी जाणीव झाली.. 


मग काय तिथून दररोज सुरू झाला आपला शारीरिक विकास..400 मीटर धावपट्टी पण नव्हती वाटते. अंदाजे आपले दररोज फुटबॉल ग्राउंड च्या भोवती चकरा मारणे सुरू झाले...फुटबॉल ग्राउंड वरून आठवले की फुटबॉल हा प्रकार सर्वात आधी मी अकरावीत jnv खेडगाव (नाशिक) येथे आल्यावर अनुभवला..spikes चे बुटं मी पहिल्यांदा पाहिले. विशे , खैरनार आदी  बलदंड उंचपुरे मुलगे होते. छान खेळायचे ते फुटबॉल..त्या खेळातही आम्ही लुडबुड केल्यागत लीलीपुट सारखे मध्ये मध्ये खेळायचो...पण आता मी त्या न्यूनगंडातून बाहेर पडलो होतो..मी ही कोणत्या तरी खेळ प्रकारात भाग घेऊ शकतो इतकी शक्ती माझ्यात आता संचारली होती...सवयीप्रमाणे ज्या विषयात डोके घातले त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा या हिशोबाने मी 400 मीटर धावणे प्रकाराचा सराव स्पर्धा सुरू व्हायच्या आदल्या दिवसापर्यंत सुरूच ठेवला.

ठरल्याप्रमाणे क्लस्टर पातळीच्या स्पर्धेसाठी आमचा चमू जवाहर नवोदय विद्यालय कन्नड औरंगाबाद येथे पोहोचला.मी jnv नाशिक टीम चा जरी भाग असलो तरीही 

हरवलेल्या पिल्लाला आपला कळप पुन्हा दिसावा आणि त्याने आपल्या कळपात पुन्हा शिरावे तसा तिथे आलेल्या jnv अक्कलकुवा नंदुरबार च्या टीम शी भेटलो. Jnv अक्कलकुवा चे माझे आवडते शिक्षक आदरणीय पाटील सर टीम सोबत आले होते. क्रीडा स्पर्धेसाठी नंदू कसा काय ? हा प्रश्न कदाचित त्यांनाही पडला असावा...सर म्हटले , "तू कसा इथे?" मी म्हटले , "४०० मीटर धावणे स्पर्धेत मी शाळेचे प्रतिनिधित्व करतोय."  सरांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. 

मशाल रॅली झाली. स्पर्धा सुरू झाल्या..एकेका स्पर्धेचे निकाल लागू लागले. समोरचे स्पर्धक बघितल्यावर आता थोड्याच वेळात माझाही निकाल लागेल अशी जवळजवळ खात्रीच झाली होती मला 😄. माझ्यावर jnv नंदुरबार आणि inv नाशिक दोघांचे लक्ष होते. त्यामुळे पोटात गोळाच आला माझ्या.. स्पर्धा सुरू व्हायच्या आधी आपले संतुलन कसे ठेवावे वगैरे वगैरे गोष्टींची _क्रीडा मानसशास्त्राची ओळखही नव्हती तेव्हा.

४०० मीटर धावणे अनाउन्समेंट झाली.स्वतःला सावरत मी रनिंग ट्रॅक वर सांगितल्याप्रमाणे उभा राहिलो. ॲथलेटिक्स ची ही माझी पहिली ओळख..एका तिरकस रेषेत वेगवेगळ्या ट्रॅक मध्ये मी आणि माझे स्पर्धक उभे राहिलो..घोषणा झाली.."On your mark, get set, go!" 

घोषणेच्या प्रत्येक शब्दाला शरीराची स्थिती बदलत मी गो म्हणताच धावायला सुरुवात केली...काही स्पर्धकांचा वेग जास्त असल्याने मी इतरांच्या तुलनेत मागेच होतो. पण  ४०० मीटर अंतर असल्याने शेवटच्या राऊंड पर्यंत वेगात सातत्य राखत मी चक्क स्पर्धा जिंकली होती..ते ही प्रथम क्रमांकाने ... Jnv नंदुरबार आणि JNV नाशिक दोन्ही टीमने अक्षरशः उचलून घेतले मला...त्यानंतर मी औरंगाबाद क्लस्टर चे प्रतिनिधित्व करत विभागीय स्पर्धेत देखील द्वितीय क्रमांक पटकावला होता..ह्यात आदरणीय साळवे सरांची खूप मदत झाली होती.


त्या दिवशी स्पर्धा जरी जिंकलो असेन पण मी क्रीडा प्रकारात काहीच करू शकत नाही ही माझी समज हरली होती...


आज २०२५ साली एक शिक्षक म्हणून मध्ये मागे वळून पाहताना २००५ साली घडलेली घटना जेव्हा आठवतो तेव्हा भावी पिढीतील विद्यार्थ्यांना सांगावेसे वाटते की ,  "Impossible itself says I'm possible" 

विवेक सांभाळत आपल्यातील strengths आणि weaknesses ओळखून त्याप्रमाणे वाटचाल केली की पुढचा प्रवास सहज सोपा होत जातो.


_ नंदू चौधरी १११३

ज. न. वि. अक्कलकुवा , नंदुरबार (१९९९_२००४)

ज. न. वि. खेडगाव , नाशिक (२००४_२००६)


(टीप _ नवोदय च्या आठवणी बऱ्याच विस्मरणात गेल्यात.पण "वश्या " माझ्या मनात दडलेल्या गोष्टी उकरून काढण्यात मोठी मदत करतो. म्हणून लिहिणे होते.)



No comments