नवीनतम

नवोदय प्रवेश पार्श्वभूमी

 दुपारचे एक दोन वाजले असतील. मधल्या सुट्टीत घरी जेवायला आलो होतो. मी न लहान भाऊ एकाच वर्गात.तेव्हा आम्ही पाचवीत होतो.आजी व आई स्वयंपाक करून शेतात गेली होती.वडील अंगणात खाट टाकून पडले होते.मी न लहान भाऊ घरात जे शिजवलेलं असेल ते घेऊन जेवायला बसलो होतो. एवढयात पोस्टमन काका आले आणि म्हणाले "भिमराव दादा ..पेढा द्या...तुमना पोऱ्याना नवोदय ले नंबर लागी गया" वडील स्वप्नातून जागे व्हावे तसे खाडकन उठून बसले.नितीन म्हणाला, "काय रे नंदू ! तू आते निंघी जाशी?" मी काही बोललो नाही. मला मुळात आनंद होण्याऐवजी दुःखच जास्त झालेलं. खरं म्हणजे घर सोडून अनोळखी ठिकाणी होस्टेल ला जाणं म्हणजे शिक्षाच वाटत होती. पण वडील खुश होते. ते जरी अकरावी नापास होते पण शिक्षणाचे महत्व जाणून होते.म्हणून त्यांनी पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कागदांची जुळवाजुळव सुरू केली. माझ्या निवडीच्या दोन तीन वर्ष आधीच आमच्या गावची दोन तीन मुलं नवोदयला निवडली गेली होती. वडिलांनी त्यांच्याकडे जाऊन,माहिती घेऊन जाण्याची तयारी केली. 

अखेर सगळी तयारी झाली होती. छोटी पिशवी त्यात कागदपत्रं आणि भाड्यापुरते पैसे घेऊन आम्ही निघालो. लहान भावाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं.मी निघालो होतो परगावी,अनोळख्या मुलखाला. सकाळच्या बसने बोरिसहून चिमठाणा आणि तिथून बस बदलून सरळ अक्कलकुवा.बस स्टॉप येण्याआधीच नवोदय विद्यालय बसस्टॉप आला.तिथल्या एका कौलारू घरावर सतत एक पंखा फिरत राहायचा. यानंतर मी त्या पंख्याला येता जाताना भरपूर वेळा बघणार होतो. सुट्ट्या संपवून जेव्हा केव्हाही मी बस्सटॉपला उतरे ,उतरायच्या आधीच तो पंखा उतरण्यासाठी इशारा करायचा. " या साहेब ,चला जेलमध्ये ,संपल्या सुट्ट्या तुमच्या." एक प्रकारे तो पंखा म्हणजे माझं दुखणं झालं होतं. त्याला पाहताच मला गहिवरून यायचं.पॅरोल संपल्याची जाणीव करून द्यायचा तो पंखा..

असो आम्ही त्या पंख्यावाल्या बस्सटॉप ला उतरून एखाद किलोमीटरच अंतर कापत चिखल तुडवत नवोदयच्या गेटवर पोहचलो. गेट मधून माझी नजर शेजारच्या गार्डन कडे गेली. एवढं मोठं गार्डन पहिल्यांदाच पाहत होतो मी. गार्डन च्या बाजूला निलगिरीच्या झाडांच्या एका रेषेत लांबच लांब रांगा जणू माझ्या reception साठी मोठ्या अदबीनं शिस्तीत उभे होते आणि पानांची टाळ करून गाणे गात होते.अशा शाळेत आज माझा प्रवेश होणार म्हणून मी खूप खुश होतो.मी स्वतःला विसरून त्या हिरव्यागार विश्वात हरवलो होतो. इतक्यात काठीने आवाज करीत गेटकीपरने भानावर आणले. "नोंदणी करा आणि उजव्या हाताकडे फिरून सरळ ऑफिस कडे जा" अशी सूचना केली. गेटकीपरने आत सोडण्याआधीच माझ्या मनाने नवोदय प्रवेश केला होता. आम्ही आत शिरलो . दोन्ही बाजुंनी हिरवीगार उंच झाडं आमच्यावर पुष्पवृष्टी करत होती.आम्ही ऑफिस जवळ येऊन थांबलो. माझ्यासारखेच इतर काही पाल्य आपल्या पालकांसोबत प्रवेशासाठी आली होती. प्रवेश अर्ज भरला आणि नंबर येण्याची वाट बघत बसलो. आमचा नंबर आला. आत मध्ये बोलावले गेले. क्लार्क बसले होते.मोराणकर नावाची पाटी लावली होती.कागदपत्रं मागितली गेली."शाळेचा दाखला , जन्म दाखला आणला आहे का?" पिशवीतली कागदं काढून सरांच्या टेबलावर ओतण्यात आली. सरांनी त्यातुन हवे असलेले शाळेचा दाखला व जन्म दाखला हातात घेतला. त्यांनी दोन तीन वेळा कागदपत्रं बघितली. त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते.नाराज होऊन ते म्हणाले ," तुमच्या मुलाचे ऍडमिशन नाही होऊ शकत." "अं ,काय?" वडील व मी एकसुरात म्हणालो. निळ्याशार आकाशात मनसोक्त उडणाऱ्या पतंगाला कोणीतरी कापावे आणि तो खाली यावा तशी माझी अवस्था झाली ." क क काय ? काय झालं साहेब?" वडीलांनी घाबरत्या आवाजात विचारलं. " मुलाची जन्म तारीख चुकली आहे. शालेय दाखल्यावर एक आणि जन्म दाखल्यावर एक. दोन दोन जन्म तारखा कशा?" वडीलांनी निराश मनाने ओतलेली कागदपत्रं पुन्हा पिशवीत भरली आणि मी माझी स्वप्नं. चित्रपट रंगात यावा आणि कोणीतरी rewind बटन दाबून पूर्वीच्या जागी आणून सोडावं असं झालं. क्षणार्धात मी ऑफिसमधून गेट ,गेटवरून बस ,बसने चिमठाणा ,चिमठाण्याहून बोरिस आणि थेट मधल्या सुट्टीत लहान भावासोबत जेवताना दिसलो मी. तेवढयात एक आवाज आला "थांबा ! काय झालं? काय अडचण आहे?" आमच्या बाजूनेच पुढं जाणाऱ्या एका गृहस्थांनी आम्हाला थांबवून विचारणा केली.कदाचित आमचे चेहरे त्यांनी वाचले असावेत. वडिलांनी सगळी अडचण सांगितली. ते गृहस्थ म्हणाले ,"कायजी करू नका. दुसरा जन्म दाखला काढी आणा.यामा दुरुस्ती करी आणा. आते जाईसन पटकन दुसरा दाखला लयी या. तो पर्यंत मी मोराणकरसरले समजाडी सांगस" त्या आपुलकीने भरलेल्या आश्वासात्मक शब्दांनी आमचा जीवात जीव आला. मित्रांनो ते सद्गृहस्थ होते आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय 'देवरे सर'. त्यांच्या शब्दांनी मोठा धीर आला होता. आता आमचा परतीचा प्रवास rewind बटणा दाबल्याप्रमाणेच होणार होता पण पुन्हा फॉरवर्ड होण्याकरिता........©नंदू चौधरी

No comments