जुनं कॅलेंडर
जुनं कॅलेंडर भिंतीवरचे
निपचित आपलं पडलेले
वार दिवस महिना तोच
फक्त वर्ष बदललेले....
तीस एकतीस दिवसांपैकी
एकका दिवसावर नजर जाई
कोरे रकाने भरले जाऊन
मन भूतकाळात हजर होई
आठवणींनीची सरमिसळ
असेच काहीसे घडलेले...
एक कॅलेंडर भिंतीवरचे
निपचित आपलं पडलेले....
एक तारीख उठून बोले
अपमान तुझ्या पदरी
दुसरी खुणावून सांगे
आनंद तुझ्या उदरी...
आनंदाचे क्षणच आठवा
कानी कोणीतरी बडबडले...
एक कॅलेंडर भिंतीवरचे
निपचित आपलं पडलेले....
वर्षामागून वर्षे सरती
क्षण हे बनती आठवणी
कॅलेंडर आपल्या पानांनी
करत असतो पाठवणी
जेव्हाचं तेव्हाच जगून घ्या
नंतर फोटो असतील मढलेले...
एक कॅलेंडर भिंतीवरचे
निपचित आपलं पडलेले....
©नंदू चौधरी

No comments