मराठीशाळेवरचं बेगडी प्रेम ...
मराठीशाळेवरचं बेगडी प्रेम ...
तिच्यावरचं बेगडी प्रेम
पाहून
माय मराठी चिडून म्हणली
देवा !
शब्द ,आश्वासनं
आता भरपूर झाली..
वृद्धाश्रमापेक्षा मला
तुमच्यासोबत ठेवा...
नेते,
दाते,राज्यकर्ते माझी पोरं
भांडवल केलंय ज्यांनी माझं
मतरुपी पेन्शन संपताच..
आईचं होऊन बसते ओझं
कुठे नेऊन ठेवलाय माझ्या संस्कृतीचा ठेवा
?
वृद्धाश्रमापेक्षा मला तुमच्यासोबत ठेवा...१
जीर्ण माझं लुगडं आता
फाटल्या शिवाय राहणार नाही
कितीही माझ्या आड लपा
उघडे पडल्याशिवाय राहणार नाही
वागवा असं की इंग्रजीस वाटेल हेवा..
वृद्धाश्रमापेक्षा मला तुमच्यासोबत ठेवा...२
तुझ्या पोराचे मित्र कॉन्व्हेंटला
त्याला त्यांच्याशिवाय करमत नाही
म्हणून टाकतोस इंग्रजी शाळेत
यात माझं काही दुमत नाही..
तूच असं बोललास तर मी कुठे जावा ?
वृद्धाश्रमापेक्षा मला तुमच्यासोबत ठेवा...३
गाजरगवतासारख्या कॉन्व्हेंट शाळा
पीक माझं गवसत नाही
गवसली तरी मी विधवा आता
तूच दोषी, ती सवत नाही
परवानग्यांची खैरात वाटली होती तेव्हा ..
वृद्धाश्रमापेक्षा मला तुमच्यासोबत ठेवा...४
मोजतेय आता शेवटच्या घटका
कोणीतरी पाणी पाजा रे
शाळा माझ्या कमी झाल्या
वाटत नाही का लाजा रे..
बस्स झालेय मी निघते माझ्या गावा..
वृद्धाश्रमापेक्षा मला तुमच्यासोबत ठेवा...५
भिंती माझ्या रंगवा, आवार माझा सजवा
दर्जेदार शिक्षणाचे सनई चौघडे वाजवा
जरा थांबू द्या मराठी शाळेत,हाच माझा विसावा
पाठवणी तरी डौलात करा,मग आनंदाने जेवा
वृद्धाश्रमापेक्षा मला तुमच्यासोबत ठेवा..देवा
वृद्धाश्रमापेक्षा मला तुमच्यासोबत ठेवा...६
© नंदू
चौधरी

मस्त भावा.... ��
ReplyDeleteमला माझ्या बाळांचं शिक्षण मराठी माध्यमातून करायचं आहे पण सध्या सगळीकडे इंग्रजी शाळाच दिसताय आणि मराठी शाळा फक्त जिल्हा परिषद च्या च आहेत. तिथल्या दर्जा ह्या राजकारणी लोकांनी म्हणावा तसा टिकवून नाही ठेवलाय.... अश्या वेळी मनात असून सुद्धा मुलांना इंग्रजी शाळेत टाकायची मजबुरी होते. महाराष्ट्र राज्यात 95% इंग्रजी शाळा ह्या नेत्यांच्या मालकीच्या आहेत... त्यामुळे मराठी शाळांना चांगले दिवस सध्या मिळणं हे एक मृगजळ आहे.