नदी आणि मी..
नदीचा उगम झाला, तसे
नदीने सरोवर सोडले..
माझ्यातला 'मी' जागा झाला
मग मी ही घर सोडले...
सुरुवातीला वियोगाचे दुःख
म्हणून प्रवाह संथ संथ
नंतर अडचणींचे डोंगर
धबधब्यांना नव्हता अंत
थांबायचा सवालच नव्हता
अश्रूंनीच पाथर फोडले..
माझ्यातला 'मी' जागा झाला
मग मी ही घर सोडले..
ज्यांनी ज्यांनी कवेत घेतले
त्यांचा होत गेलो
खाचखळग्यांतून नदीसोबत
मी ही पोहत गेलो
किनाऱ्यावरचे बघतच राहिले
कोरड्या जागी पाझर फोडले..
माझ्यातला 'मी' जागा झाला
मग मी ही घर सोडले...
प्रवास असाच सुरू आहे
समुद्र अजून दूर आहे
नदीचे वागणे बदलत गेले
कधी दुष्काळ कधी पूर आहे
जखम खोलवर रुतलीय
पुराच्या पाण्याने वरवर खोडले..
माझ्यातला 'मी' जागा झाला
मग मी ही घर सोडले..
शेवटी पुन्हा प्रवाह संथ
नदी समोर सिंधू आला
माझ्यातला मी नाही
त्यातलाच एक बिंदू झाला
"पाणी जरा खारटच होतं बरं का!"
शेवटीही नदीवरच खापर फोडले..
माझ्यातला 'मी' लुप्त झाला
बरे झाले मी भवसागर सोडले...
© Chaudhari Nandu
No comments