नवीनतम

आ. देवरे सर - सेवापूर्तीच्या शुभेच्छा

प्रति,

आदरणीय देवरे सर,

आपणांस सेवापूर्तीच्या मनापासून शुभेच्छा  ...आपले सेवानिवृत्तीनंतर चे आयुष्य आरोग्यदायी जावो , हीच प्रार्थना भगवंताकडे या प्रसंगी करतो.

नवोदय म्हटलं की आठवणींची सरमिसळ. जशी एखाद्या सासुरवाशीणीला सासरी आपल्या माहेराचं कोणी भेटल्यास अत्यानंद होतो तेवढाच आनंद आम्हा जनवि अक्कलकुवावासीयांना नाशिक नवोदयला आपणांस भेटल्यावर झाला होता. आम्ही नाशिक नवोदयला नवखे होतो परंतु आपला मोठा आधार होता म्हणून सहज सुरुवातीचे दिवस कसे गेले समजले नाही. अमोल- आपला चिरंजीव आमचा जिवलग मित्र. आपल्या सारखाच मनमिळाऊ. अमोल आणि वडाळीभोईचा देव्या आमच्यात एवढे मिसळले की नाशिक नंदुरबार अंतर कधीच मिटले. आमच्यात आणि त्याच्यात कधी भेद नाही केलात आपण. आपले निवासस्थान आमच्या होस्टेलला लागूनच असल्याने आम्हाला कधी कशाची भीती वाटलीच नाही. क्रिकेटची मॅच म्हटली की अख्खा वर्ग आपल्या घरी असायचा. पण मॅडम किंवा आपण कधी एका शब्दाने हटकले नाही. उलट आमच्यासोबत ती मॅच एन्जॉय करायचात. वेदकालीन गुरुकुल गुरू - शिष्य परंपरा काय असावी, याची अनुभूती आम्हाला नवोदय आणि आपणामुळे मिळाली. 

मध्यंतरी आपली जनवि पालघर - माहीम येथे तब्बल १६ वर्षांनी भेट झाली. निमित्त होते माझ्या विद्यार्थीनीचं नवोदय ऍडमिशन. आयुष्याच्या परिघावर चालताना एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. आपल्यासोबत जेवलो. गप्पा केल्या. नवीनच ऍडमिशन झालेल्या पिल्लांना त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधता यावा म्हणून आपली धडपड बघून तुमच्यातल्या मातृहृद्याचे पुन:श्च एकदा दर्शन झाले.नर्स मॅडम  भेटल्या. त्यांनीही मुलासारखी चौकशी केली. त्या ही आता सेवा निवृत्त झाल्यात वाटतं.

 आपली कारकीर्द नेहमी स्मरणात राहील सर. आपण नवोदय विद्यालयात नसाल ही भावनाच मुळी सहन होत नाही. नवोदयला गेल्यावर एक हक्काचं व्यासपीठ नसेल आम्हा माजी विद्यार्थ्यांना...नवोदयला गेल्यावर तुमच्या ह्या जुन्या पाखरांना कोण कवेत घेईल सर ?😢जुन्या आठवणींना कोण उजाळा देईल? प्रश्नच आहे. आपल्यासारखे जुने शिक्षक आमच्यासाठी नाळ आहात जी आज तुटते की काय याची जाणीव मनी होतेय. 

असं म्हणतात ना की

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती

आता नवोदयला गेल्यावर फक्त शाळेच्या इमारती असतील आणि घराचं घरपण देणारे - 'तुम्ही' नसल्यावर प्रेम- जिव्हाळयाची कमतरता नक्की भासेल.

असो. आयुष्याला कुठेतरी स्वल्पविराम ही असावा. आम्हा विद्यार्थ्यांना घडवता घडवता कदाचित कुटुंबाला वेळ देता आला नसेल तो आता पुरेपूर द्या आणि मनसोक्त जगा. आरोग्याला जपा.

आपली सेवा माझ्यासारख्या शिक्षकांना सतत नंदादीपासारखे मार्गदर्शन करत राहील सर.

आपलाच- 

नंदू

7588176456



No comments